Friday, April 13, 2012

विरामचिन्हे

नेहमीच 
तिच्या बोलक्या डोळ्यांत उद्गारचिन्हं 
भाव भिन्न भिन्न
नवलाई, आनंद, कौतूक, 
भीती, वेदना, त्रागा 
सगळं काही उच्चाराविना उद्गारणारी 
उद्गारचिन्हं !!!

तिच्या बंद ओठांवरच्या अवतरणचिन्हांत
कायमच वसलेलं गूढसं मौन
आणि तिचे शब्द त्या भक्कम कवाडाच्या आत अडकलेले
जन्मठेपेचे कैदी
" "

चुकून एखादा शब्द ओठांबाहेर आलाच
तर त्याच्यापुढे अपरिहार्यपणे धावणारं
अपसरणचिन्ह ...................................
तिचं अपुरेपण सिद्ध करायला सिद्ध............

अर्ध ; स्वल्प , अपूर्ण :
विरामांना तिच्या आयुष्यात स्थानच नाही
हवाय कशाला तिला विराम?
विरेल तेव्हा पाहू ; , :

हो, पूर्णविराम मात्र आहे
भाळावरच्या गोंदणटिकलीत.
'बस, सगळं संपलं इथे, सुरू होण्याआधीच.'
ही नियतीच्या लेखाची इतिश्री दाखवणारा.

संयोगचिन्हे -
तिला ठाउकच नाहीत
संयोग नामक काही संकल्पना अस्तित्वात तरी आहे?
यदाकदाचित असलीच, तर भ्रामक असावी - बहुधा नसावीच.

आता उरलं काय?
अरे हो, प्रश्नचिन्ह राहिलंच ना ...........
ते तर तिच्या पाचवीच्याही बरंच आधी पुजलेलं
तिच्या गर्भातल्या अस्तित्वापासून
तिची सोबत करणारं
हो की नाही?????????????

No comments:

Post a Comment