Monday, April 23, 2012

आडनिडा गावजन्म सरू आला, संपली ना धावाधाव 
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव 

अनवाणी पावलांना वैशाखाची झळ
अतोनात छळणारी काळजाची कळ
पळसाच्या आगेमागे बाभळीचे फाटे
काट्यांतून चालले की माझ्यातच काटे?
मैलोगणती वस्तीचा नाही काही ठाव
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

सरली ना वाट जरी दुपार सरली
चोरपावलांनी सांज वनात शिरली
थकून थांबले आभाळात घोडे साती
हळूहळू पायांखाली थंडावली माती
पार ना आडोसा, कुठं टाकावा पडाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

वाटेवर कोणी चिटपाखरू फिरेना
रात किर्र अंधाराची सरता सरेना
पिसाट सावल्या, रातकिड्यांचा कल्लोळ
मन सैरभैर जसं उठावं मोहोळ
थरकाप होतो, कसा लागावा निभाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव

आता थकली पाउले, जडावला जीव
मंदावत जाती श्वास, देही भरे हीव
मिट्ट काळोखाचं रान आत-बाहेरून
राही अजगरापरी आयुष्य घेरून
सरड्याची कुठे कुंपणाच्या पुढे धाव?
अजूनही दूर त्याचा आडनिडा गाव


2 comments:

  1. क्रांतीदी, तुमच्या रचनांचा भक्त झालो आहे ...

    ReplyDelete
  2. वा वा!!
    काय वर्णन केलं आहे आपण!! अगदी डोळ्यासमोर येतं!

    ReplyDelete