Friday, August 17, 2012

काहूर

वितळून चालले किरण 
सांज की सरण?
फिकटत्या ज्वाळा
अस्वस्थ ढगांचा पाळा

धुमसत्या चितेचा धूर
तसे काहूर
मना वेढून
सरपटते मळकट ऊन

का क्षितिज मेघ माखून
घेत झाकून
दिशांची दारे
बहकले कशाने वारे?

हे चिताभस्म की राख?
धुक्याचे वाख
उडवते माया
उन्मत्त निशेची छाया

ही सांज जीव घेणार
आज होणार
भयंकर काही
ही प्रलयाची का द्वाही?

संपेल कधी संहार?
पुसट अंधार
लपवितो रक्त
उरणार उसासे फक्त 

Tuesday, August 14, 2012

रिक्त पेला

तुझा आवेश वाटे तोल गेल्यासारखा 
मना का वागसी उन्मत्त जेत्यासारखा? 

कसोटी जेवढी वाटे तशी सोपी नसे 
कळे वाचून का संसार वेच्यासारखा? 

नको ते वाद होती आणि चर्चा गाजती,
पडे बाजूस मुद्दा लक्ष देण्यासारखा

जिथे जावे तिथे येतो व्यथांचा काफिला
निरागस बालकाने हट्ट केल्यासारखा!

हवेसे वाटले ते ते पुरेसे लाभले
तरीही जन्म अर्ध्या रिक्त पेल्यासारखा 

सारखी

का उसळते सारखी? 
हाव छळते सारखी 

मी न वणवा की दिवा
मात्र जळते सारखी

बावचळली सावली
दूर पळते सारखी

मौनव्रत साधू कसे?
जीभ चळते सारखी

मी सरळमार्गीच हो,
वाट वळते सारखी !

Thursday, August 9, 2012

नको जाऊस

पाचोळा होऊन जीव 
सोसतो हीव
सुसाटत वारा
उडवून नेतसे दूर 
उरी काहूर 
कुठे न सहारा 

मन सांद्र रान दाटले 
झरे आटले
खिन्न नेत्रांत
कंठाशी व्याकुळ प्राण
शुद्ध ना त्राण
क्लांत गात्रांत

चिमणे घरटे उधळून
चूड लावून
सरे वैशाख
आषाढ-श्रावणी सरी
रडुन कधितरी
भिजविती राख

आभाळ भरुन ओथंब
पुसटसे थेंब
दूरवर झरती
शमली ना थेंबतहान
नद्या बेभान
सागरा भरती

ठेवून तुला गाफील
भिडुन जाईल
मुका पाउस
रे, सावर वेड्या जिवा
मालवुन दिवा
नको जाऊस  

चादर

रंग उडाला, विटली, विरली 
जीर्ण कुडीची मळकी चादर
ज्याची त्याला द्यावी आता, 
श्वास मोकळा घ्यावा क्षणभर 

विणकर मोठा हुशार, कसबी
आत्मियतेने विणली त्याने 
तलम मुलायम धागे गुंफुन 
घेत विलक्षण कौशल्याने

असे गुंतले धागे, ज्यांची
गाठ न दिसली, जोड न कळले
अवघड होती वीण तरीही
कुठे न टाके चुकले, गळले

अशी अलौकिक चादर त्याने
सुपूर्त केली माझ्या हाती
मी अज्ञानी, अजाण, अल्लड
त्या ठेवीची केली माती

किती कडाके हिने सोसले,
किती झेलल्या गारा-धारा
कधी माखले धुके, कवळला
कधी उतरता-चढता पारा

जरी विनासायास मिळाली,
माझ्यासाठी झिजली कणकण
जन्मभराची ऊब, सावली
मी न राखली बूज तिची पण

आज तिची महती कळूनही
घडी येइना मूळ पदावर
ज्याची त्याला द्यावी आता
नकोच ओझे फुका मनावर !

[प्रेरणा अर्थातच कबीरजी की चदरिया आणि गुलजार यांची गिरहें]

निनावी

किती जन्म सोसू व्रणासारखे?
नसे पाप भोळेपणासारखे 

न समृद्ध वारे पुन्हा वाहिले 
कुठेही तुझ्या अंगणासारखे 

उरी वेदनांचे अघोरी ठसे
खिळे ठोकल्या कुंपणासारखे

झुगारून आयुष्य गेले मला
झुकांडी दिलेल्या क्षणासारखे

रिते, कोरडे प्राक्तनाचे घडे
जुन्या, आटल्या रांजणासारखे

तुझ्या आठवांनीच झंकारले
ऋतूही तुझ्या पैंजणासारखे

धुवांधार केव्हा, कधी कोरडे
तुझे भेटणे श्रावणासारखे

सरावे तुझ्या पायरीशी जिणे
धुळीच्या निनावी कणासारखे