Thursday, August 9, 2012

चादर

रंग उडाला, विटली, विरली 
जीर्ण कुडीची मळकी चादर
ज्याची त्याला द्यावी आता, 
श्वास मोकळा घ्यावा क्षणभर 

विणकर मोठा हुशार, कसबी
आत्मियतेने विणली त्याने 
तलम मुलायम धागे गुंफुन 
घेत विलक्षण कौशल्याने

असे गुंतले धागे, ज्यांची
गाठ न दिसली, जोड न कळले
अवघड होती वीण तरीही
कुठे न टाके चुकले, गळले

अशी अलौकिक चादर त्याने
सुपूर्त केली माझ्या हाती
मी अज्ञानी, अजाण, अल्लड
त्या ठेवीची केली माती

किती कडाके हिने सोसले,
किती झेलल्या गारा-धारा
कधी माखले धुके, कवळला
कधी उतरता-चढता पारा

जरी विनासायास मिळाली,
माझ्यासाठी झिजली कणकण
जन्मभराची ऊब, सावली
मी न राखली बूज तिची पण

आज तिची महती कळूनही
घडी येइना मूळ पदावर
ज्याची त्याला द्यावी आता
नकोच ओझे फुका मनावर !

[प्रेरणा अर्थातच कबीरजी की चदरिया आणि गुलजार यांची गिरहें]

1 comment: