Tuesday, December 1, 2009

कविते तुज शोधित आले

मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले

इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले

मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले

तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू भावुक  मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले

तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले

7 comments:

  1. सुंदरच!! अतिशय तरल शब्द, भावस्पर्शी....:)

    ReplyDelete
  2. सुरेख कविता! छानच जमली आहे.

    ReplyDelete
  3. सडेकर बाई : मला बहुतांश वेळा तुमच्या कविता कळतच नाहीत, किंवा ओढूनताणून केल्यासारख्या वाटतात, किंवा अष्टाक्षरीची लय असताना (ओल्या हळदीची सांज़, डिसेंबर २००९) सोळा अक्षरे एका ओळीत का घेतली आहेत असले प्रश्न मनात येतात. 'नकोसे वाटते' (नोव्हेंबर २००९) वाचताना 'खेळणे शब्दांसवे - आता नकोसे वाटते' या शान्ताबाईंच्या कवितेवर ती बेतली आहे का, आणि असल्यास तसा उल्लेख का नाही, असे प्रश्न डोक्यात येतात. मुळात ग़ज़ल किंवा सुरेश भटांची विचाराची पद्‌धतच मला कधी आवडलेली नाही. त्याची छाप असलेल्या तुमच्या कविता मला आवडत नाहीत, यात आश्चर्य नाही.

    'कविते, तुज़ शोधित आले' वाचताना मात्र कुसुमाग्रजांच्या रचना आठवल्या. आणि मग ती कविता खूपच आवडणार हे ठरूनच गेले. नादमयतेच्या दृष्टीनीदेखील रचना उत्तम आहे. तुम्ही ही कविता कुठल्या मोठ्या प्रकाशनात छापून आणा. पहिले कडवे वाचताना 'सरोवरावर संथ वाहता रात्री मन्दानिल - उमटे नाज़ुक आन्दोलन' या ओळी आठवल्या. तिसर्‍या कडव्यात बालकवींची कुठलीशी 'चन्द्र ... कर्षितो सागरलहरी तरी' अशी रचना आठवली. शेवटल्या कडव्यात 'परि स्मरते आणिक करते व्याकुळ केव्हां, त्या माज़घरातील मन्द दिव्याची वात' हे कुसुमाग्रजांचे शब्द आठवले. थोडीफार रचनेत शिथिलता आहे, पण तो किरकोळ मुद्‌दा झाला कारण आशय एकूण चांगला मांडला आहे. 'तन्मय' शब्द दोनदा आला आहे. तो चौथ्या कडव्यातून गाळल्यास कविता ज़ास्त चांगली होईल, असे मला वाटते. 'आशिर्वाद' आणि 'मनिषा' या दोन शब्दांच्या नशिबी शुद्‌धलेखन नाही. 'आशीर्वादाचे' असा शब्द हवा. नादाचे आकर्षण असलेल्या माझ्यासारख्यासाठी कविता खूपच सुन्दर आहे. कारण 'आशिर्वादाचे' या अशुद्‌ध प्रयोगातही मात्रा तितक्याच राहतात. संपूर्ण कवितेत अंगात भिनणारी लय आहे.

    या २-८-८-४ (मन-सरोवराच्या - जलात चिमणा - पक्षी) मात्राविभागणीला काही नाव आहे का? नववधू वृत्ताच्या धृवपदात (नव-वधू प्रिया मी - बावरते) २-८-६ गट आहेत. उद्‌धवात (जी-वन रवि उदया - आला) २-८-४ असे विभाग पडतात, ज़े तुम्ही धृवपदात वापरले आहेत. तुम्ही वापरलेली २-८-८-४ मात्रामाण्डणीही माझ्या मनात कुसुमाग्रजांचीच एक आवडती कविता ज़ागी करती झाली : का चरण केधवा तुम्हांस त्याचे दिसले? थोर कवी आशय सुद्‌धा कसा घट्ट बांधतात, शब्द वाया न घालवता, त्याचे ही कविता एक उदाहरण आहे.
    पूर्ण कविता :
    मी एक रात्रि त्या नक्षत्रांना पुसले
    परमेश्वर नाही घोकत मन मम बसले ।
    परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी ।
    का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले ॥ १ ॥

    स्मित करुन म्हणाल्या मला चांदण्या काही ।
    तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही |
    उठतात तमावर त्याची पाउलचिन्हे ।
    त्यांनाच पुससि तू, आहे तो की नाही ॥ २ ॥

    २-८-८-४ विभागातले ८ आणि ८ मात्रांचे ज़वळज़वळ सगळे समूह (प्र-वासी सारखा अपवाद सोडल्यास) शब्द संपतो तिथेच कसे संपतात याकडे लक्ष द्‌या. पण इथे उगीचच तुमची रचना कुसुमाग्रजांपेक्षा कमी कसदार दाखवण्याचा उद्‌देश नाही. तुमच्या कवितेलाही सुन्दर नाद आहे. कुसुमाग्रजांची गोष्टच वेगळी.

    या (२-८-८-४ वाल्या) मात्रावृत्ताला नाव आहे का?

    अप्रतिम कवितेबद्‌दल पुन्हा एकदा आभार.

    ReplyDelete
  4. दोन मात्रांच्या धक्क्यानी सुरु होणार्‍या रचना आता मला अगदी छळताहेत; तो ताप थोडा इतरांनाही द्‌यायची इच्छा होते आहे.

    + | प - प | + - , अशी या २-८-८-४ वाल्या छंदाची (म्हणजे मात्रावृत्ताची किंवा जातिची) मांडणी करायला हरकत नसावी. यात '+' म्हणजे दोन मात्रांचा समूह, '-' म्हणजे गुरु, आणि 'प' म्हणजे अष्टमात्रिक समूह. उद्‌धव छंद - | प | - + = १४ असल्याचा लेख धोंडोपंत आपटे यांनी मिसळपाव साइट-वर लिहिला होता. पण त्यातली ग्रेस यांची एक ओळ 'खडकातुन फूल उगवता' चा शेवट '+ -' असा होतो, आणि त्यामुळे काही फरक पडत नाही. तेव्हा सरळ शेवटी '+ +' असा उपभाग का न घ्या? त्यात फक्त ज-यं-त हा चतुर्मात्रिक ज-गण बसणार नाही.

    ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला
    या अक्रूर (२०+१४ मात्रा)
    . मधे प,प,-- नंतर -,प,+- असा १४ मात्रांचा उद्‌धवातला चरण येतो. तुम्हीही 'कवि~ते तुज़ शोधित ~ आले' या धृपदासाठी उद्‌धव वापरले आहेच. पण अक्रूराचा पहिला भाग मला २-६-६-६ असा वाटतो. किंवा २-६-८-४ असा.

    शिवाय 'मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी' (काय तुम्हाला शब्द सुचले आहेत!) या २-८-८-४ मात्रारचनेतल्या काही इतर रचना आठवल्या. हा कुसुमाग्रजांचा आवडता छंद दिसतोय.
    लाडकी बाहुली होती माझी एक (इंदिरा संत (की शान्ताबाई?))
    पुळणीत टेकले माथे शान्त अधीर (कुसुमाग्रज, टिळकांच्या
    . पुतळ्यावरची ही कविता असावी.)
    नवलाख विज़ेचे दीप तळपती येथ (कुसुमाग्रज)
    वर पूर्ण चंद्रमा पसरी मायाजाल (कुसुमाग्रज, ताजमहाल)
    ओतीत विखारी वातावरणी आग
    हा वळसे घालित आला मंथर नाग (कुसुमाग्रज, अहि-नकुल)

    या सर्व कविता अनेक वर्षांपासून माहीत असूनही हे समान सूत्र आधी लक्षात आले नव्हते. ते आणून दिल्याबद्‌दल तुमचे आभार.

    या छंदाला नक्की नाव असणार.

    - नानिवडेकर

    ReplyDelete
  5. शेवटी या २-८-८-४ मात्राविभाग असणार्‍या ज़ातिवृत्ताचा शोध माधवराव पटवर्धनांच्या 'छंदोरचना' ग्रंथात लागला. त्याचे नाव 'भूपति' आहे, आणि त्याच्या ज़वळच्या 'जगदीश्वरबाला' ज़ातीचाही उल्लेख आहे.

    कुसुमाग्रजांची मी दिलेली सर्व उदाहरणे 'छंदोरचना' ग्रंथ १९३७ साली प्रकाशित झाल्यानन्तरची असतील. माधव जूलियन यांनी दिलेले एक उदाहरण असे :
    किती अन्त पाहशील माझा रे गुणवंता ?

    भूपतिची रचना जिचा उपविभाग असते असे दोन छंदही पटवर्धनांनी नोन्दवले आहेत :
    यशोदा : भूपति + उद्‌धव
    कारटा तुझा हा द्‌वाड यशोदा बाई
    . कां पडला अमुचे डाईं? (डावी?)

    मदनशर : उद्‌धव + भूपति
    हा वसन्त ऋतु अनिवार
    करि मदनशरांचा मार बहुत बेज़ार

    अक्षरसंख्येवर आधारित ८-८-८-४ अशी रचना असलेल्या छंदाच्या नावाचा शोध मात्र अज़ूनही सुरुच आहे. एक उदाहरण म्हणून कुसुमाग्रजांची ही रचना आहे :
    उठा उठा चिऊताई
    सारीकडे उजाडले
    डोळे तरी मिटलेले
    . अजूनही !

    - - - -

    ReplyDelete
  6. भूपति वृत्ताचे मी दिलेले उदाहरण होते :
    किती अन्त पाहशील माझा रे गुणवंता ?
    काही वेळानी माझ्या लक्षात आले की 'किती' अशी या ओळीची सुरवात असू शकत नाही, कारण ओळ दोन मात्रांच्या गटानी सुरु व्हायला हवी. माधवराव पटवर्धनांनी ही ओळ :
    किती अन्त पाहशिल माझा रे गुणवंता ?
    अशी उदाहरण म्हणून दिली आहे, आणि मी 'पाहशील' लिहून केलेली चूक टाळलेली आहे. पण 'किती' हा शब्द पटवर्धनांनीही चूकच लिहिला आहे. सहसा मी अशा चुका करत नाही, आणि पटवर्धन तर त्या अजिबातच करत नाहीत. पण या वेळी मात्र ती चूक झाली खरी. उशीरा का होईना, ती लक्षात आली याचे समाधान आहे.
    त्या ओळी अशा :
    किति अन्त पाहशिल माझा रे गुणवन्ता ?
    तुज़~विण पळ युग सम~ज़तो पंढरी~नाथा .
    निर्णयसागर नावाच्या पदसंग्रहातल्या या एका अनामिक कवीच्या ओळी आहेत. त्यातल्या दुसर्‍या ओळीतला 'विण पळ युग सम' हा आठही लघु अक्षरे असलेला पद्‌मावर्तनी (अष्टमात्रिक) समूह अतिलघुत्वामुळे तितकासा चांगला वाटत नाही. तरीही ही रचना भावोत्कट आहे.

    - डी एन

    ReplyDelete