Thursday, March 4, 2010

कृतार्थ

माझ्यापाशी चार कोन, तुला वर्तुळाचा ध्यास
कुंपणात माझं जग, तुला क्षितिजाची आस

माझ्या अंगणी कोरांटी, तुला गुलाबाचा छंद
दु:ख माझे गणगोत, तुझा सोयरा आनंद

माझ्या कापल्या पंखांत खोल वेदनेची कळ,
तुझ्या पंखांत पेरते नभ जिंकायाचे बळ

माझी चंदनाची काया, झिजे तरी नाही खंत
वात्सल्याच्या सुगंधाने दर्वळू दे आसमंत

माझ्या चिमणपाखरा, तुझी वाढू दे रे भूक
तुझ्या बोलक्या डोळ्यांत खुळ्या मायेचं कौतूक

तुझी स्वप्नं, तुझा ध्यास, तुझे यत्न व्हावे सार्थ,
तुझी गगनभरारी, माझं आयुष्य कृतार्थ

3 comments:

  1. अगं कसली भन्नाट आहे ही कविता. मला सर्वात जास्त आवडलेली कविता आहे ही.

    ReplyDelete