Wednesday, November 10, 2010

त्रिधारा - शब्द

त्रिधारा हा माझा एक नवा प्रयत्न. तीन ओळींच्या कविता हा प्रकार तसा नवा नाही. गुलजारजींची त्रिवेणी आपण सारेच जाणता. जपानी हायकू हाही तीन ओळींच्या कवितेचा प्रकार.
माझ्या या तीन ओळींच्या धारा मिळून बनलेली त्रिधारा. प्रत्येक ओळीत दहा ते अकरा अक्षरे आहेत, बाकी मात्रा-वृत्त असं काही बंधन नाही. यमक पहिल्या आणि तिसर्‍या ओळीत.
या पाच त्रिधारा "शब्द" या एकाच विषयावरच्या आहेत.


* शब्द जसे गंधहीन वारा
उघडे अत्तर उडून जावे,
तसा उडाला अर्थच सारा!

* शब्दांच्या पलिकडले काही,
अर्थ जयाचा गहन, गूढसा
मौन एकटे बोलत राही!

* शब्द उमाळे, शब्द उसासे
बघता बघता विरून गेले,
उधार दे ना शब्द जरासे!

* तुझे शब्द की गाणे सुंदर?
की माझा अंधार उजळते,
लखलखते तेजस्वी झुंबर?

* भिरभिर शब्दांचा पाचोळा
वार्‍याने उधळला नभावर,
ओंजळीत मी केला गोळा!

3 comments:

  1. सॉलीड आहे. काव्यप्रकार आणि तू दिलेलं नावही. तीन मोजक्याच ओळींमधे नेमकं उतरलेत भाव.

    ReplyDelete
  2. त्रिधारा काव्यप्रकार आवडला ..

    ReplyDelete
  3. शब्द जसे गंधहीन वारा
    उघडे अत्तर उडून जावे,
    तसा उडाला अर्थच सारा!

    khoopach sundar!!
    Haa kaawy prakaar hee mohak aahe`

    ReplyDelete