Wednesday, January 5, 2011

सोबतीला सांजवेळी

सोबतीला सांजवेळी आठवांची तटबंदी
खंदकात एकटीच फिरते मी, जायबंदी!

सोबतीला सांजवेळी ओल्या हळदीचे ऊन
लाजलाजरी पश्चिमा रंग होळीचे माखून

सोबतीला सांजवेळी रातराणीच्या चाहुली
हूड वारा डोकावता अंगणात रानभुली

सोबतीला सांजवेळी ऐन भरतीच्या लाटा
वाळूवर पावलांनी कोरल्या सोनेरी वाटा

सोबतीला सांजवेळी दूर पांगत्या सावल्या
टपोरल्या जाईजुई पानांतून डोकावल्या

सोबतीला सांजवेळी पक्ष्यांची शुभंकरोती
देवापुढे, वृंदावनी तेवणार्‍या दीपज्योती

सोबतीला सांजवेळी उगवती चंद्रकोर
दाराआडून डोकावे जशी बुजरीशी पोर

सोबतीला सांजवेळी ध्यास-भासाचा हा खेळ,
तुझी वाट पाहणारी आतुर कातरवेळ

सोबतीला सांजवेळी द्वाड, बोचरा गारवा,
कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा!

2 comments:

  1. अप्रतिम ! अतिशय सुंदर...

    शब्दाशब्दातून आशय बहरतोय...
    अर्थाला न्याय देणारे शब्द...

    तुमच्या कवितेत शब्द आणि अर्थ ह्यांचं 'फुल आणि सुगंधासारखं' नातं... अतिशय लोभसवाणं, सुखद आणि मनस्पर्शी !

    'बुजरीशी पोर' ही खूपच लाघवी प्रतिमा, खूप सुंदर !

    सोबतीला सांजवेळी ऐन भरतीच्या लाटा
    वाळूवर पावलांनी कोरल्या सोनेरी वाटा... खूप सुंदर !


    सोबतीला सांजवेळी ध्यास-भासाचा हा खेळ,
    तुझी वाट पाहणारी आतुर कातरवेळ ... खूप सुंदर !


    सोबतीला सांजवेळी द्वाड, बोचरा गारवा,
    कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा! ... खूप खूप सुंदर !

    ReplyDelete
  2. व्वा !!!
    सोबतीला सांजवेळी निसर्गाच्या साथीने
    गायलेलं हे काव्य .....
    “कधी श्वासात पूरिया, कधी ओठांत मारवा!”
    …… सुंदरच.

    ReplyDelete