Saturday, July 13, 2013

भरारी

संकल्प मोडवेना अन् ध्यास सोसवेना 
हल्ली मलाच माझा सहवास सोसवेना 

फांदीस होत ओझे, देठास भार वाटे
वाऱ्यासही कळ्यांचा निश्वास सोसवेना

झटक्यात जायचा तो थांबून जीव राही
अस्वस्थ भावनांचा गळफास सोसवेना

जाणीव शब्दवर्खी अन् शब्द मर्मस्पर्शी
माझीच मांडलेली आरास सोसवेना

वेड्या वसंतकाळी ग्रीष्मात गुंतले मी
आता अखंड झरता मधुमास सोसवेना

वाटे असेल काही अस्तित्व सावलीला
कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना

कापून पंख केला उन्माद जायबंदी
स्वप्नातली भरारी सत्यास सोसवेना

2 comments:

  1. वाटे असेल काही अस्तित्व सावलीला
    कोठे, कसे, किती हा अदमास सोसवेना...

    सुरेख गझल . या ओळी तर-क्या बात है

    ReplyDelete