Sunday, June 10, 2012

असा घ्यावा वसा


असा घ्यावा वसा जशी सावित्रीची पाटी 
ज्ञानाचं भांडार खुलं लेकीबाळींसाठी

असा घ्यावा वसा, चिंधी जशी सिंधू व्हावी
आभाळालाही मायेची पाखर घालावी

असा घ्यावा वसा, जशी बाबांची साधना
यज्ञकुंडातही समिधेची आराधना

असा घ्यावा वसा, राणी-अभय निर्भय
ज्याला नाही स्वार्थ त्याला कशाचे ना भय

असा घ्यावा वसा, सुख द्यावं दु:ख घ्यावं
प्राणीमात्रांत ईश्वर, त्याला नित्य ध्यावं

असा घ्यावा वसा, अहंकार ओलांडावा
निर्मळ मनाच्या दारी आनंद सांडावा

असा घ्यावा वसा, द्यावा काळोखा प्रकाश
क्रोध, लोभ, माया, मोह सोडवावे पाश

असा घ्यावा वसा, फुलवावा रिता माळ
माती तिथली पूजाया झुकेल आभाळ

असा घ्यावा वसा, उतू नये, मातू नये
घेतलेला वसा जन्मभर टाकू नये 

जगण्यावर जीव जडावा



चिरमुक्तीचा अलख जागवित तेजस जोगी मनात यावा 
तृप्तीने अंतर निथळावे अन् जगण्यावर जीव जडावा

लहरत यावी साद सावळी, ह्रुदयगोकुळी रास सजावा
तनमन जणु वृंदावन व्हावे अन् जगण्यावर जीव जडावा

कुठला कान्हा, कुठली राधा, स्वत्व विरावे, भेद मिटावा 
द्वैत सरावे, भान हरावे अन् जगण्यावर जीव जडावा

परमात्म्याच्या दर्शनमात्रे निमिषातच संदेह सरावा 
आसक्तीचा पाश गळावा अन् जगण्यावर जीव जडावा

नश्वर देहाच्या बंधातुन आत्मानंद विमुक्त उडावा
धुके भ्रमाचे वितळुन जावे, अन् जगण्यावर जीव जडावा


मेघश्याम जादुगारा

डोळां स्वप्न दावण्याची 
जीवा ओढ लावण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

तुझ्या पावरीचे सूर
मोहवून नेती दूर
ध्यानीमनी नसताना
पायी नादती नुपूर
चित्ततार छेडण्याची
संभ्रमात पाडण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

यमुनेच्या तीरावर
येते घेऊन घागर
पांघरून निळेपण
तुझे तनामनावर
रंग-गंध शिंपण्याची
देह-प्राण जिंकण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा

तुझा मनात निवास
तरी दुरावा दिलास
तुला भेटण्यासाठीच
जन्मभराचा प्रवास
द्वैतभाव मोडण्याची
जिवा-शिवा जोडण्याची
तुझी निराळीच तऱ्हा
मेघश्याम जादुगारा