चिरमुक्तीचा अलख जागवित तेजस जोगी मनात यावा
तृप्तीने अंतर निथळावे अन् जगण्यावर जीव जडावा
लहरत यावी साद सावळी, ह्रुदयगोकुळी रास सजावा
तनमन जणु वृंदावन व्हावे अन् जगण्यावर जीव जडावा
कुठला कान्हा, कुठली राधा, स्वत्व विरावे, भेद मिटावा
द्वैत सरावे, भान हरावे अन् जगण्यावर जीव जडावा
परमात्म्याच्या दर्शनमात्रे निमिषातच संदेह सरावा
आसक्तीचा पाश गळावा अन् जगण्यावर जीव जडावा
नश्वर देहाच्या बंधातुन आत्मानंद विमुक्त उडावा
धुके भ्रमाचे वितळुन जावे, अन् जगण्यावर जीव जडावा
No comments:
Post a Comment