Sunday, June 17, 2012

कुणी काढली खपली?

फसव्या हास्याच्या खपलीच्या आड कधीची लपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

कसेबसे टाके घालुन मी कडा जुळवल्या होत्या 
उरी वेदना जपून ओठी कळ्या फुलवल्या होत्या 
सांत्वन चंदनलेप लावला, हळूवार ती जपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

शब्दांचे कशिदे काढुन मी दाहक खूण बुजवली 
व्रण लपवावे म्हणुन भरजरी कविता तिथे सजवली 
आज अचानक कशिदाकारी कुण्या दिठीला खुपली?
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?

भळभळणारी जखम मनाची फिरून भिजली आहे 
लेप संपला, शब्द उसवले, कविता थिजली आहे 
उपहासाचा वार असा की क्षणात शुद्ध हरपली 
जखम जराशी सुकली होती, कुणी काढली खपली?


Monday, June 11, 2012

माउली


वसे घ्यायचे आणि सांभाळण्याचे तिच्यापासले मी वसे घेतले 
दुभंगूनही बिंब न्यारे दिसावे, असे जादुई आरसे घेतले 

तिचे भोग अन् भोगणेही निराळे, निराळी तिच्या सोसण्याची तऱ्हा 
कडाका असो की असो काहिली, जे मिळाले, जसेच्या तसे घेतले 

जरा सावरू पाहते तोच यावी नवी यातना पाहुणी अंगणी 
सुखांना तिच्या शोषले खंगलेल्या व्यथांनी, पुन्हा बाळसे घेतले 

तिचे वेद-गीता, तिचा धर्म-अध्यात्म सारे तिच्या कोटरी नांदले 
वृथा अक्षरे वाचली फक्त आम्ही, तिने अंतरी ते ठसे घेतले 

नसे वेदनांची कधी ज्यास पर्वा, असे शांत, लोभावणारे हसू 
तिने काळजाच्या कळा सोसताना कधी हास्य हे छानसे घेतले?

तिचे दु:ख,कौशल्य दु:खासही सौख्य मानायचे घेतले मी जरी 
तरी मंद निष्पाप, जाईजुईसारखे हासणे का नसे घेतले? 

असे माउली ती, जिने या जिवाला दिला सार्थ आकार अन् चेतना 
जिणे धन्य झाले, अनायास मीही तिचे तृप्तिचे वारसे घेतले 

Sunday, June 10, 2012

अतर्क्य

दोन जिवांचे असे गुंतणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 
वास्तवातही स्वप्न गुंफणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

एकतानता किती असावी, 
एकरूपता किती असावी?
भिन्न देहि मन एक नांदणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

भेट जीवनी क्वचितच घडते
तरी कधी ना अंतर पडते 
दूर दूर, तरि तीच स्पंदने 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

गूज कधी अपुले सांगावे 
कधी आसवांतून झरावे 
कधी काहिली, कधी चांदणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

जशी मंदिरी ज्योत तेवते
तशी भावना मनात वसते 
मेघ-धरित्री तशी बंधने 
अतर्क्य सारे, अगम्य सारे 

नाव न या नात्याला काही 
नसे दूरता, जवळिक नाही 
द्वैतातुन अद्वैत सांधणे 
अतर्क्य सारे, अगम्य सारे