Friday, August 9, 2013

चकवे

इथला वनवास नकोच मना
विषघोट नकोस गिळू कडवे
चल दूर, निबीड तमात बुडू
असतील जिथे गहिरे चकवे

निमिषात निशा, निमिषात उषा
प्रहरात जगू क्षणमात्र जरी
असतील जिथे ढग कोंदटसे
झरतील तिथेच कधी शिरवे

अभिजात इथे न कुणास रुचे
इथल्या सगळ्याच रिती भलत्या
हरवून निरामयता, शुचिता
उरलेत दुवे नकली, नटवे

घनदाट असेल अरण्य जरी
करतील सुसह्य तुझ्या मनिषा
चकव्यातुन दाविल वाट खरी
चिरकाल तुझे असणे हळवे

विसरून जगास जगेन तरी
वगळून तुला कुठले जग रे?
सगळेच तुझे अलवार किती,
शपथा, वचने, रुसवे-फुगवे


[वृत्त - तोटक]

प्रतिभे

दिस दोन हवेत मनोज्ञ असे 
मग संततधार झरो दुविधा 
क्षण मी तळपेन जशी चपला 
जरि जन्म पुरा जळती समिधा 

घनदाट तृणात भुजंग, तरी
फुलतात निरागस रानफुले 
अवसेपुरते तमजाल, पुन्हा 
झुलणार नभावर चंद्रझुले

पथ दुर्गम आणि अरुंद जरी,
सृजनासमवेत प्रवास हवा
मळभातुन, सांद्र धुक्यातुनही
उजळेल प्रसन्न प्रकाश नवा

कुठल्या वळणावर भेट तुझी
अनमोल घडेल सखे कविते
इतके अवधान कुठे? तरिही
घट अंतरिचे करतेच रिते

निमिषार्ध पहा थबकून जरा,
मन मूढ तुझ्या पदि शांत उभे
कवळून नको हृदयास धरू,
पण उज्ज्वल आशिष दे प्रतिभे


[वृत्त - तोटक]

Monday, August 5, 2013

हासता मी

कोणत्या जन्मातले हे गूढ नाते?
हासता मी हास्य कोमेजून जाते 

भोवताली गल्बला होतो नको तो,
हासता मी केवढा उत्पात होतो 

क्षार मागे शांतवाया ती भुकेला,
हासता मी कंठ फुटतो वेदनेला 

भाबडा आनंद होतो वीतरागी
हासता मी वादळे होतात जागी

जाणते ती आतली अव्यक्त भाषा
हासता मी मावळे दुर्दम्य आशा

वाटते त्याला, पुन्हा आघात झाला
हासता मी दु:ख येते सांत्वनाला

जन्म अवघा मारवा रंगून गातो
हासता मी आसवांचा तोल जातो

फिकटला, विटला मुखवटा हा गळेना
हास्य माझे बेगडी, तरिही ढळेना