Monday, October 31, 2011

हार

तसेही न्यायचे काहीच नाही पार जाताना
तुला देईन मी सारे तुझे साभार जाताना

जरा पाहून एकाकी जिवाला घेरती छाया
निराधारास या देशील का आधार जाताना ?

अरे, आता उपेक्षेच्या व्रणांना लिंपले होते,
नको मारूस प्रेमाने, कशाला वार जाताना ?

विसंवादीच होते ना तुझेही सूर माझ्याशी,
जुळावी आज का माझ्या मनाची तार जाताना ?

जरी वाटेत त्याच्या आर्जवांनी घातल्या हाका,
नको, नाहीच आता घ्यायची माघार जाताना

मिळावी ना फुकाची वाहवा, होती अपेक्षा ही
अपेक्षाभंग व्हावा, एवढा सत्कार जाताना ?

पुरे आयुष्य काट्यांनी जरी जोपासले होते,
मिळाले केवढे सारे फुलांचे हार जाताना !

Saturday, October 29, 2011

तुझी आठवण


मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण !

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण ?

निरोप घेता मळभ दाटले
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे
असे जसे वळवाचे शिंपण !

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतींचे घेउन दर्पण !

- क्रांति

[मायबोली हितगुज दिवाळी अंक २०११ इथे पूर्वप्रकाशित]

Friday, October 28, 2011

काही सुचले नाही तेव्हा

काही सुचले नाही तेव्हा
नाव तुझे कोरले ढगांनी
आभाळाच्या निळ्या पटावर

काही सुचले नाही तेव्हा
काहीबाही बोलत बसले,
कधी मनातिल, कधी मनावर

काही सुचले नाही तेव्हा
प्रवाहात सोडल्या लकेरी,
बुडून गेली सुरांत घागर

काही सुचले नाही तेव्हा
पापणीत अडवून ठेवला
उफाळणारा प्रशांत सागर

काही सुचले नाही तेव्हा
गुंफायाला दिले मनाला
आठवणींचे मणी पसाभर

काही सुचले नाही तेव्हा
दोघे दोन दिशांना वळले,
पुनव फिकटशी, चंद्र अनावर