Thursday, January 27, 2011

एका चंद्रासाठी


सांज गर्भारली, चंद्र प्रसवेल । घर उजळेल, सृष्टी हरखली
सांज प्रसवली, टपोर चांदणी । आली ग अंगणी, सृष्टी उसासली!
फिरून सांजेला चंद्राचे डोहाळे । कौतूकसोहाळे होती अतोनात
पुन्हा एकवार सांजेच्या अंगणी । नवीन चांदणी, कौतूक ओसरे
कितीतरी झाले नवससायास । दिवा लावायास चंद्र नाही आला
आभाळ भरून चांदण्यांची दाटी । एका चंद्रासाठी किती आटापिटा!
थकली-भागली सांज मावळली । जन्माची काहिली, भोग नवसाचे
आक्रीत कसं हे झालं एकाएकी? लोक म्हणे लेकी कपाळकरंट्या!
आली नवी सांज एका चंद्रासाठी । चांदण्यांच्या पाठी दुर्दैवाचा हात
नव्या सांजेलाही नव्याची चाहूल । चंद्राचीच हूल इथून-तिथून
सांज कौतुकाच्या मखरी बसली । हळूच हसली गर्भात चांदणी!
कुणीतरी बोले, "चंद्र नाही बाई!" सरे नवलाई, सांज पिसाटली
गर्भातच विरे चांदणहुंकार । दाटला अंधार, रिते घरदार
सोसती चांदण्या जन्माची आबाळ । झुरतं आभाळ एका चंद्रासाठी!

5 comments:

  1. गर्भितार्थ (अर्थात मला कळलेला :-)) आवडला.

    ReplyDelete
  2. नेहमीपेक्षा वेगळा ढंग ..... आवडला.

    ReplyDelete
  3. अप्रतिम... जबरदस्त personification..

    ReplyDelete
  4. अप्रतिम ! नि:शब्द झालो ही कविता वाचून....

    ReplyDelete