Sunday, January 23, 2011

राती


जागून जन्म सारा गेल्या शिणून राती
झाकून काजव्यांना गेल्या निजून राती

कोजागिरी सखी ही लाजून लाल झाली
श्वासांत चांदण्यांच्या गेल्या भिजून राती

जादू तुझ्या सुरांची, की मोहिनी रुपाची?
या मैफलीत येता गेल्या खिळून राती

जागेच राहणे का दैवात आज आहे?
घेऊन नीज माझी, गेल्या निघून राती

झाले जराजरासे आभाळ केशराचे,
ओल्या पहाटगर्भी गेल्या थिजून राती

"काळोख फार झाला, द्या ना उजेड थोडा!"
मी एवढे म्हणेतो गेल्या विरून राती

आली फुलून गात्रागात्रात रातराणी
शिंपून चंद्र आता गेल्या इथून राती

त्याने कधी निखारे रंध्रांत पेरलेले,
त्याच्याच फुंकरीने गेल्या विझून राती!

तू फक्त हाक दे, मी सोडून जन्म येते,
तेथेच जायचे ना, गेल्या जिथून राती?

2 comments:

  1. अप्रतिम !

    श्वासांत चांदण्यांच्या गेल्या भिजून राती... खूप सुंदर !

    ReplyDelete
  2. "तू फक्त हाक दे, मी सोडून जन्म येते,
    तेथेच जायचे ना, गेल्या जिथून राती?"

    ......... अतिशय सुंदर

    ReplyDelete