Tuesday, January 3, 2012

ऐक जरा ना...........

ऐक जरा ना...........
छपरावरच्या पागोळ्यातुन टपटपणा-या थेंबांचे जलतरंग सुमधुर 
पहिल्या भेटीला जाताना बावरलेल्या पैंजणातली नवथर हुरहुर

ऐक जरा ना............
तुझ्या बोलक्या डोळ्यांमधली स्वप्ने चोरुन रंगवलेली धुंद रुबाई
तुझ्या पेंगत्या स्वप्नांना जोजवीत हलके गुणगुणली वत्सल अंगाई

ऐक जरा ना............
खळाळणा-या झ-यातल्या जलप-या चालल्या गात ऋतूंची अवखळ गाणी
वाळूच्या उबदार उशीवर शांत पहुडल्या लाटांची लयबद्ध कहाणी

ऐक जरा ना............
वा-यासरशी सळसळणारी मंत्रभारली अद्भुत, दैवी पिंपळबोली
अन त्या घनगंभीर सुरांच्या कुशीतल्या घरट्यात किलबिले कुजबुज ओली

ऐक जरा ना............
शांत, निरागस, मंद ज्योतिच्या छायेमधली पावन स्तोत्रे, सांजवंदना
अन ऑर्गनच्या सुरांतून त्या क्रूसावरच्या करुणामय आत्म्यास प्रार्थना

ऐक जरा ना............
विश्वाला व्यापुन उरलेल्या नीरवातल्या गगनश्रुतींचा नाद अनाहत
चराचराला गुंगविणारे, अणुरेणूतुन पाझरणारे स्वरधन शाश्वत

ऐक जरा ना............
तुझ्याचसाठी, फक्त तुझ्यासाठीच रंगले मौनातुन संवाद लाडके
या हृदयाने त्या हृदयाला सांगावेसे, ऐक जरा ना, ऐक कौतुके !

4 comments:

 1. या हृदयाने त्या हृदयाला सांगावेसे, ऐक जरा ना, ऐक कौतुके !

  sundar.

  ReplyDelete
 2. निव्वळ अप्रतिम..

  ReplyDelete
 3. शब्द , आशय, लय सर्वच अप्रतिम... खुप खुप सुंदर, खुपच सुंदर...

  ReplyDelete