Sunday, January 29, 2012

निरोप

मन रान, रान जळणारे ,
हेमंती उष्ण उसासे 
हुलकावुन श्रावण जातो
नुसते देऊन दिलासे

संन्यस्त, विरागी वारा,
वेलींचे पान न हलते
चित्ताच्या आत, तळाशी
गलबलते, काही सलते

विसरावी कोणी वचने
मुरलेल्या सहजपणाने
तितक्या सहजी गळती का
स्मरणांची पिवळी पाने ?

ती गुणगुणताना झरते
कातळनेत्रांतुन पाणी
सांजेला कुणी शिकवली
ही करुणविव्हळशी गाणी ?

आत्म्याच्या आत झिरपत्या
उत्कट दु:खाच्या धारा
आवेग असा की जावा
थेंबात बुडून किनारा

प्राणांच्या घुमटामधल्या
घंटांचे गंभिर ठोके
अस्वस्थ जिवाला करती
किति ठेवू बंद झरोके ?

ही कुण्या दिशेची यात्रा,
या गूढ कोठल्या वाटा ?
निष्प्राण कलेवर तैशा
निस्तेज पसरल्या लाटा

विरल्या स्वप्नांची दाटी
मिटणाऱ्या पापणकाठी
दे निरोप माझ्या इथल्या
शेवटच्या यात्रेसाठी 

3 comments:

  1. you write very well. will read your blong. thanks for the comment. good day. abhijit atre.

    ReplyDelete
  2. सुंदर कविता
    "विसरावी कोणी वचने
    मुरलेल्या सहजपणाने
    तितक्या सहजी का गळती
    स्मरणांची पिवळी पाने"
    आणि हे तर अफाटच

    ReplyDelete
  3. सुंदर कविता
    "विसरावी कोणी वचने
    मुरलेल्या सहजपणाने
    तितक्या सहजी का गळती
    स्मरणांची पिवळी पाने"
    आणि हे तर अफाटच

    ReplyDelete