Monday, February 6, 2012

एक हुंदका, दोन शिंपले


शब्द संपले, सूर संपले, भाव आणि भावार्थ संपले जाता जाता

काय जोडले, काय तोडले, द्वंद्व हे कसे कोण जिंकले जाता जाता ?


कोण कोणती वाट चालले, कोणत्या क्षणी सौख्य पांगले कोणा ठावे ?

एकरूपता, एकतानता का न साधली, वाद रंगले जाता जाता


गुंफण्यास या ओंजळीत ती कोवळी फुले राहिली कुठे प्राजक्ताची ?

मी म्हणेन 'निर्माल्य राहिले' तो म्हणेल 'तू गंध गुंफले जाता जाता!'


शांत होइतो मंदिरातली सांजवातशी मंद तेवले या संसारी 

स्नेह संपला जाणले तरी पाश कोणते सांग गुंतले जाता जाता 


रोज सावल्या चंद्रदेखण्या व्हायच्या तसे स्वप्न यायचे मागे मागे 

आज एकटा चंद्र राहिला सावल्यांसवे, स्वप्न भंगले जाता जाता


ठेवलेत मी चार शब्द, काही सुरावटी आणि बंदिशी त्याच्यासाठी 

सोबतीस घेऊन चालले एक हुंदका, दोन शिंपले जाता जाता


2 comments:

  1. क्रांती,अग किती सुंदर लिहिले आहेस...."सोबतीस घेउन चालले एक हुंदका,दोन शिंपले जाता जाता...." फार सुंदर गं..

    ReplyDelete
  2. खूपच मस्त .... शेवटची द्विपदी .... ग्रेट ..... ____/\____

    ReplyDelete