Thursday, October 22, 2009

बहुधा

त्याला माझे मोहरणे रुचलेच नसावे
त्याचे माझे बंध कधी जुळलेच नसावे

शब्दांचे हे गाव पोरके, केविलवाणे,
भावार्थाचे बीज इथे रुजलेच नसावे


भासांनी सावल्या जपाव्या, तसली नाती,
वेडे मन त्यांचे सावज पहिलेच नसावे !

त्याच्या वाटा कशा कोरड्या? बहुधा त्याला
आषाढाचे आमंत्रण दिसलेच नसावे


मैलाच्या दगडांवरचे अंतर मिटलेले,
या वाटेवर पुन्हा कुणी फिरलेच नसावे


येता जाता श्रावण येथे थांबत होता,
त्याचे आर्जव मातीला कळलेच नसावे !


कालकुपीतुन काही क्षण हलकेच चोरले,
त्यांत जशी जगले मी, कधि जगलेच नसावे !


पात्यावरच्या दंवबिंदूसम अलिप्त व्हावे,
इथे असावे तरी कधी इथलेच नसावे !

1 comment:

  1. क्रान्ति शेवटच्या दोन ओळी फारच आवडल्या. ज्याला हा अलिप्तपणा जमला तोच खरा जगला....
    अर्थपूर्ण कविता.

    ReplyDelete