नव्यासाठी नवे काही मला घडवायचे होते
जुन्या पर्वातले संदर्भही बदलायचे होते
तुझ्यासाठीच बहराच्या ऋतूंना रोखले होते,
तुला आनंदयात्रेचे निमंत्रण द्यायचे होते
किती सांभाळल्या होत्या नव्या आशा, नवी स्वप्ने,
मनापासून आयुष्या तुला सजवायचे होते
जिथे माझे कुणी होते, तिथे मन गुंतले नाही
(कधीकाळी मला माझ्यात गुंतुन जायचे होते!)
ऋणातुन मुक्त झाले मी, तरी कळले कधी नाही,
कुणाचे कर्ज होते, जे मला चुकवायचे होते?
जगावेसे जरासे वाटता मरणा तुझी घाई,
सुकावे लागले; जेव्हा मला उमलायचे होते!
या क्रान्तिच्या कविता आणि फक्त कविता, अग्निसखा [फिनिक्स] प्रमाणे खरोखरच स्वत:च्या राखेतून जन्मलेल्या.ज्यांच्यामुळे आणि ज्यांच्यासाठी ती जगते!

Wednesday, December 30, 2009
Wednesday, December 23, 2009
ओल्या हळदीची सांज
माझ्या सुरांत गुंफून तुझी लडिवाळ गीते
ओल्या हळदीची सांज रोज अंगणात येते ||
क्षण मोहरून जाती तुला साद मी देताना
मन रेंगाळते मागे तुझ्या वाटेने जाताना
हात धरून मला ती तुझ्या घराकडे नेते ||
आसमंत गंधाळतो जाईजुईच्या फुलांनी
उंबरठा ओलांडते कुंकवाच्या पावलांनी
तुळशीच्या वृंदावनी नंदादीप उजळते ||
वा-यावर घुमतात मंद सुरांच्या लकेरी
हलकेच डोकावतो चंद्र कोवळा रुपेरी
मावळतीच्या हातात हात चांदण्याचा देते ||
Thursday, December 17, 2009
रिती पोकळी
रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची
इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?
जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?
प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची
कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची
इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?
जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?
प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची
कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?
Saturday, December 5, 2009
काजवा
कसा कातरवेळेला घुमे मनाचा पारवा
हवे आभाळ मुठीत, चंद्र ओंजळीत हवा
किलबिलणारी सांज, ओढ मनी कोटराची,
निळ्या नभाचे गोंदण, तसा पाखरांचा थवा
वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा
वेल जाईची सजली चांदण्यांच्या बहराने,
मस्त गंधाच्या धुंदीत निशिगंधाचा ताटवा
देव्हा-यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवा
हवे आभाळ मुठीत, चंद्र ओंजळीत हवा
किलबिलणारी सांज, ओढ मनी कोटराची,
निळ्या नभाचे गोंदण, तसा पाखरांचा थवा
वृंदावनात तुळस, मंजि-यांची दाट नक्षी
प्रकाशाची फुले झाली, उजळता सांजदिवा
वेल जाईची सजली चांदण्यांच्या बहराने,
मस्त गंधाच्या धुंदीत निशिगंधाचा ताटवा
देव्हा-यातल्या ज्योतीने घरदार प्रकाशले,
मन माझे उजळतो तुझ्या भासाचा काजवा
Tuesday, December 1, 2009
कविते तुज शोधित आले
मनसरोवराच्या जलात चिमणा पक्षी
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले
इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले
मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले
तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू भावुक मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले
तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले
हलकेच उठवितो नाजुक तरंग नक्षी
त्या तरंगनक्षीचे कंकण मी ल्याले
कविते, तुज शोधित आले
इवल्या इवल्याशा बाळमुठी चुरणारे,
झोपेतच हसुनी मंत्रमुग्ध करणारे
ते ओठ दुधाचे टिपुनी तन्मय झाले
कविते, तुज शोधित आले
मायेची थरथर सुरकुतल्या स्पर्शाची,
कौतुकभरल्या नजरेत लहर हर्षाची,
मी आशिर्वादाचे अमृतकण प्याले
कविते, तुज शोधित आले
तू हवीहवीशी साथ सख्या सजणाची,
तू भावुक मीरा दासी हरिचरणाची,
तुजसाठी जगले, तुझ्यात तल्लिन झाले,
कविते, तुज शोधित आले
तू रम्य सकाळी मंदिरात भूपाळी
तू सांजवात तेवतेस संध्याकाळी
त्या शांत ज्योतिसह मी उजळून निघाले
कविते, तुज शोधित आले
Subscribe to:
Posts (Atom)