Thursday, July 15, 2010

किती सुखाचे असेल

नवे नसे रे प्याद्याचेही वजीर होणे
कितीकदा पाहिले नृपाचे फकीर होणे

गिळून एकच घोट विषाचा शुद्ध हरावी,
हवे कशाला कणाकणाने बधीर होणे?

तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!

असे तसे हे वेड नसे, भलतेच पिसे हे,
क्षणात संयम, क्षणात व्याकुळ, अधीर होणे

घुमे विठूचा घोष, पंढरी दुमदुमताना
तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!

स्वतःस उधळुन द्यावे अन् मनमुक्त जगावे,
किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!

5 comments:

  1. छान.

    तुला सदोदित आळविले मी स्वार्थासाठी,
    मला न जमले मीरा होणे, कबीर होणे!


    व्वा! "तनामनाचे गुलाल, बुक्का, अबीर होणे!" ही ओळही खूप आवडली.

    ReplyDelete
  2. किती सुखाचे असेल वेडा फकीर होणे!


    faarch chhan ...

    ReplyDelete
  3. काय सुरेख लिहिता हो तुम्ही !
    एकापेक्षा एक भिडणारी द्विपदी .....
    I am Your fan !

    - Anubandh

    ReplyDelete