Friday, May 14, 2010

अबोल प्रीत

जाणते अबोल प्रीत, आर्जवे मनात किती
रंगते सुरेल गीत, स्पर्श बोलतात किती!

मन चंचल फुलपंखी भिरभिरते तुजभवती
स्मरणरंग भरुन तुझे चित्र रेखिते नवती
तेज चांदण्यास नवे, चंद्रही भरात किती!

रुणझुणत्या स्वप्नांचे हिंदोळे झुलवित ये
मंद मदिर समिरासह चैत्रबहर फुलवित ये
संग क्षणांचा भरतो रंग जीवनात किती!

अधरांच्या उंब-यात नाव तुझे का अडते?
अधिर गूज थरथरत्या पापण्यांत का दडते?
लज्जेचे जलतरंग वाजती सुरात किती!

Wednesday, May 12, 2010

तृषार्त


राहु दे मला तृषार्त, राहु दे मला अतृप्त
बंधनात राहुनही मन माझे बंधमुक्त

गूज मनाचे मनास मौनातुन उलगडले
शब्दावाचून भाव शब्दांच्या पलिकडले
ओळखले नजरेने, जरि अबोल अन अव्यक्त

ते हळवे, तरल स्पर्श सांगुन गेले सारे
ओठ बोलले न तरी बोलुन गेले सारे
आगळेच प्रेमगीत गुणगुणते अधिर चित्त

नवलाचे क्षण अलगद अंतरात साठवु दे
ते फुलणे, ते खुलणे, ती हुरहुर आठवु दे
चिंतनात अविरत मी, आणि तुझा ध्यास फक्त 

स्वप्नापरि जे घडले ते अभंग राहू दे 
झुरण्यातच विरण्याचे सौख्य मला साहू दे
ओलांडून मोहाचे उंबरठे, मी विरक्त!

Friday, May 7, 2010

नवे गीत

ओल्या जखमेमधून नवे गीत पाझरावे
कोसळते घर जसे वादळाने सावरावे

वेदनेच्या पाळण्यात खुळे स्वप्न जोजवावे,
व्यथा ठेवावी उशाशी आणि दु:ख पांघरावे

मृगजळापाठी धावताना तोल सांभाळावा,
सावल्यांशी खेळताना देहभान विसरावे

बेफाम जगावे, जशी वाहे पुरातली नदी,
ओहोटीच्या दर्यापरी हळुवार ओसरावे

कोण आता इथे ज्याला आस तुझ्या प्रकाशाची?
काजळी कलंक माथी मिरवीत का उरावे?