Friday, May 7, 2010

नवे गीत

ओल्या जखमेमधून नवे गीत पाझरावे
कोसळते घर जसे वादळाने सावरावे

वेदनेच्या पाळण्यात खुळे स्वप्न जोजवावे,
व्यथा ठेवावी उशाशी आणि दु:ख पांघरावे

मृगजळापाठी धावताना तोल सांभाळावा,
सावल्यांशी खेळताना देहभान विसरावे

बेफाम जगावे, जशी वाहे पुरातली नदी,
ओहोटीच्या दर्यापरी हळुवार ओसरावे

कोण आता इथे ज्याला आस तुझ्या प्रकाशाची?
काजळी कलंक माथी मिरवीत का उरावे?

3 comments:

  1. कविता छान आहे. क्रांती तू ब-याच कविता लिहिल्या आहेत पण तू नकारात्मक कविता जास्त का लिहितेस? एखादी मस्त, हलकीफुलकी कविता कर ना!

    ReplyDelete
  2. बेफाम जगावे, जशी वाहे पुरातली नदी,
    ओहोटीच्या दर्यापरी हळुवार ओसरावे

    -छान

    ReplyDelete