राहु दे मला तृषार्त, राहु दे मला अतृप्त
बंधनात राहुनही मन माझे बंधमुक्त
गूज मनाचे मनास मौनातुन उलगडले
शब्दावाचून भाव शब्दांच्या पलिकडले
ओळखले नजरेने, जरि अबोल अन अव्यक्त
ते हळवे, तरल स्पर्श सांगुन गेले सारे
ओठ बोलले न तरी बोलुन गेले सारे
आगळेच प्रेमगीत गुणगुणते अधिर चित्त
नवलाचे क्षण अलगद अंतरात साठवु दे
ते फुलणे, ते खुलणे, ती हुरहुर आठवु दे
चिंतनात अविरत मी, आणि तुझा ध्यास फक्त
स्वप्नापरि जे घडले ते अभंग राहू दे
झुरण्यातच विरण्याचे सौख्य मला साहू दे
ओलांडून मोहाचे उंबरठे, मी विरक्त!
No comments:
Post a Comment