Wednesday, March 9, 2011

तिची गोष्ट

तिने सावली मागितली की धावत धावत ऊन जायचे
कणसांतुन दाणे भरताना तिचे मळे करपून जायचे

तिला चार थेंबांची आशा, ढग तेव्हा नुसते फुगलेले
तिला भूल वर्षेची देउन अर्ध्यातुन परतून जायचे

पुनव तिने अंगावर घ्यावी, तेव्हा चंद्राने रुसायचे,
जरा चांदणे वेचू जाता आभाळच हरवून जायचे!

तिने खळाळुन हसू पहावे तो ओठांना तडे जायचे
रडे आवरू म्हणताना ती, नेत्र भरून झरून जायचे

तिने उन्हाशी मैत्री केली, ग्रीष्माचा सारंग छेडला,
आणि ठरवले, ऊन पांघरुन सावलीस विसरून जायचे!

तिला तिचा अंधार भावला, जन्मभराची अवस पावली
तिची निश्चयी नजर पाहता चांदणेच शरमून जायचे!

हसू तिच्या ओठांवर आता येते केवळ तिच्याचसाठी,
तिने ठरवले हास्यालाही अश्रूंनी मढवून जायचे!

तिला एवढे कळले आता, न मागता जे मिळून गेले
तेच आपले, परक्यासाठी काय हात पसरून जायचे?

4 comments:

 1. सुंदर आहे! नेहमीच्यासारखी वाटत नाही पण आवडली.

  तिला एवढे कळले आता, न मागता जे मिळून गेले
  तेच आपले, परक्यासाठी काय हात पसरून जायचे?

  ReplyDelete
 2. "तिला तिचा अंधार भावला, जन्मभराची अवस पावली
  तिची निश्चयी नजर पाहता चांदणेच शरमून जायचे!"

  ...... हे जास्त भावलं

  ReplyDelete
 3. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 4. तिची निश्चयी नजर पाहता चांदणेच शरमून जायचे!"

  surekh !

  ReplyDelete