Tuesday, March 1, 2011

सोयरा



श्रावणाने आटलेला तो झरा माझाच होता
वादळांनी बांधलेला आसरा माझाच होता

कैक त्या पात्रात गेले, अन् सुखे परतून आले,
मी बुडाले एकटी, तो भोवरा माझाच होता

तो जरी चुकवून गेला ताल माझ्या बंदिशीचा,
मैफलीला जिंकणारा अंतरा माझाच होता

वाजले पाऊल माझे आणि त्या निश्चिंत झाल्या
काढला माझ्या व्यथांनी धोसरा माझाच होता!

खेचताना राहिल्या का घागरी खाली, तळाशी?
खोल बारव, काचणारा कासरा माझाच होता

हार त्याची, जीत माझी; ऐन वेळी घात झाला
हारला जो जिंकताना, मोहरा माझाच होता

भांडताना पाहिले मी काल माझ्याशीच ज्याला,
आरसा आता म्हणे, तो चेहरा माझाच होता!

तू म्हणे दारात त्याला ना दिला थारा कधीही,
मी कसे दु:खास टाळू? सोयरा माझाच होता!

2 comments:

  1. काढला माझ्या व्यथांनी धोसरा माझाच होता!

    खासच!

    ReplyDelete
  2. खूप सुंदर .... अप्रतिम ....

    ReplyDelete