Friday, May 22, 2009

अंत

फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरून जावे
पाचोळ्यापरी अंत नको

जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे
नुसता कोकिळकंठ नको

रंग रूप रस गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे
कोशातिल सुरवंट नको

क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे
गती कधीही संथ नको

अद्भुत काही असे घडावे
असणे नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो रडवुन गेलो
इतका साधा अंत नको

1 comment:

  1. सुरेख
    विशेषतः
    > जगणे अवघड झाले तेव्हा
    > दिला सुरांनी जन्म नवा
    > जन्मांतरी हे सूर भिनावे
    > नुसता कोकिळकंठ नको
    आणि
    > अद्भुत काही असे घडावे
    > असणे नसणे सार्थ ठरावे
    > रडतच आलो रडवुन गेलो
    > इतका साधा अंत नको

    ReplyDelete