Wednesday, June 24, 2009

अमृताच्या धारा

झाली शांत, तृप्त धरा,
अशा बरसल्या धारा
सांगे गंधाचा निरोप
तुझ्या अंगणीचा वारा

गर्द सावळे आभाळ
राशी रूप्याच्या सांडते
सौदामिनी उजळते
तुझा गगनगाभारा


झेलताना तनूवर
हिरेमोती आनंदाने
लाख डोळ्यांनी फुलतो
मनमोराचा पिसारा


तुझ्या करुणेचा मेघ
माझ्या दारी झरताना
जागेपणी पापण्यांत
स्वप्न येतसे आकारा


माझ्या जन्माचे सार्थक
तुझे ओसंडून देणे,
माझी चातकाची तृषा,
तुझ्या अमृताच्या धारा

1 comment:

 1. >>माझ्या जन्माचे सार्थक
  >>तुझे संडून देणे,
  >>माझी चातकाची तृषा,
  >>तुझ्या अमृताच्या धारा
  क्या बात है! मस्तच!

  आता थोडं टेक्निकल बोलतो ;)
  अष्टाक्षरी छंद वापरून फक्त शेवटच्या ओळीत (गज़लेप्रमाणे) यमक जुळवण्याचा पॅटर्न आवडला. (दोन ओळी जोडून एक ओळ केली, तर गज़लेतल्याप्रमाणे यमक होईल.)
  :)

  ReplyDelete