Monday, June 27, 2011

निशाणी


हसन कमाल यांच्या ’फ़ज़ां भी है जवां जवां’ या गीताचा स्वैर भावानुवाद.


मंद मंद वाऱ्यासह सृष्टी गाते चैतन्याची गाणी
आसमंत छेडतो पुन्हा ती कधीतरी ऐकली कहाणी

साद घालती दुरून उत्कट बहराचे फुलपाखरी थवे
वाट पाहती जशी कुणाची अधिर विखुरले रंगताटवे
प्रीतीच्या सांगती कथा या अवखळ लाटा, अल्लड पाणी

तृप्ती की ही अतृप्ती? की मृगतृष्णा अनिवार, अनावर?
इथे ना तिथे जिवास शांती, दाटुन आले मळभ मनावर
ऊन-सावली लपंडाव की दुराव्यात जवळीक पुराणी?

एक हरवला क्षण, त्या शोधत येता क्षणही निघून जाई
क्षणात मीलन होते, तोवर क्षण विरहाचा करतो घाई
येती-जाती, क्षण विरघळती अंतरात ठसवून निशाणी


आणि ही मूळ रचना

फज़ा भी है जवाँ जवाँ, हवा भी है रवाँ रवाँ
सुना रहा है ये समा, सुनी सुनी सी दास्ताँ ॥धृ॥

पुकारते हैं दूर से, वो काफ़िले बहार के
बिखर गए हैं रंग से किसी के इंतज़ार के
लहर-लहर के होँठ पर वफ़ा की हैं कहानीयाँ ॥१॥

बुझी मगर बुझी नहीं, न जाने कैसी प्यास है ?
करार दिल से आज भी, न दूर है न पास है
ये खेल धूप-छाँव का, ये कुरबतें, ये दुरीयाँ ॥२॥

हर एक पल को ढूँढता, हर एक पल चला गया
हर एक पल फ़िराक़ का, हर एक पल विसाल का
हरेक पल गुज़र गया बना के दिल पे इक निशाँ ॥३॥

Sunday, June 19, 2011

परीस

खुशीत यावा पहाटवारा, धुके झरावे हळूहळू
सुगंध माळून सायलीने फुलून यावे हळूहळू

मिटून जाव्या जुन्या खुणा अन् तुटून जावीत बंधने,
नव्या दिशेला नवीन वाटेवरून जावे हळूहळू

उगाच काटे जपायचे की मनाप्रमाणे फुलायचे,
झुरायचे की झुलायचे हे तुला कळावे हळूहळू

उदासवाण्या नको विराण्या, नवे तराणे मला हवे,
अबोल तारा सुरांत येता सुनीत गावे हळूहळू

पुन्हापुन्हा आठवांत राती सरायच्या, ओसरायच्या
कळ्या स्मृतींच्या खुडून, जावे उडून रावे हळूहळू!

असा मिळावा परीस ज्याने सुवर्ण व्हाव्यात वेदना,
व्यथेस यावा झळाळ, दु:खास तेज यावे हळूहळू

Monday, June 13, 2011

तुला पावसाची आण

तेच थेंब, त्याच सरी, तोच तो खट्याळ वारा
नवानवासा वाटतो, जरी तोच तो इशारा

तेच थेंब, त्याच सरी, तीच पागोळ्यांची गाणी
त्याच मातीच्या गंधाची नवीन अत्तरदाणी

तेच थेंब, त्याच सरी, त्याच कागदाच्या नावा
नव्या उत्साहाने वाट जाते स्वप्नातल्या गावा

तेच थेंब, त्याच सरी, गाभुळलं रानोमाळ
मोर नाचतो धुंदीत, थेंबांचे बांधून चाळ

तेच थेंब, त्याच सरी, तरी नव्हाळी नव्हाळी
गंधगीत गात डोले माझी बकुळडहाळी

तेच थेंब, त्याच सरी, तोच सुरेल मल्हार
आसुसल्या धरणीला नवा हिरवा शृंगार

तेच थेंब, त्याच सरी, नवं सृजनाचं वाण
दे ना मलाही उदारा, तुला पावसाची आण!

Saturday, June 11, 2011

घन

घन व्याकुळला तेव्हा मी त्याचीच सावली होते
घन कोसळताना त्याच्या अस्वस्थ चाहुली होते

घन रसरसला, मोहरला, मी नवी पालवी ल्याले
घन फाल्गुनातल्या रानी मी पळसपाकळी होते

घन घुटमळला, विरघळला किरणांच्या धुंद मिठीत,
घन रासरंग गगनात, मी सांज सावळी होते

घन शापित गंधर्वाच्या कंठात मुक्त गंधार,
घुमविता सखा मल्हार मी तान त्यातली होते

घनगर्द घनाची छाया, घननीळ घनाची माया
घनघोर गर्जला तेव्हा मी रात्र वादळी होते

घन मनात, घन देहात झिरपून झरे प्राणांत
घन कणकण भिजवत होता, मीही तहानली होते!


Thursday, June 2, 2011

मनासारखे मिळे न उत्तर


दीपककुमार यांच्या "उदासी खूबसूरत" या कवितेचा स्वैर भावानुवाद.

लाटांच्या कोलाहलातही असीम शांती जपतो सागर
स्वर्णरक्तिमा नभात विहरत रंगबिंब सांडतो जलावर
किलबिलणारे थवे निघाले परतुन अपुल्या कोटराकडे,
श्रमपरिहारा निघे सूर्यही क्षितिजपार, अन् सागरी बुडे
दृश्य रोजचे पहात असता नकळत झरते डोळ्यांतुन सर
उदास कातरवेळ असे ही, तरी भासते अतीव सुंदर
प्रश्न पडे हा नित्य निरंतर, मनासारखे मिळे न उत्तर,

पितृगृहाला सोडुन जाता पतीगृही, रमणी रडताना,
मेघ नसे आभाळी तरिही उन्हे हरवताना, दडताना,
रंगपंचमी सरता धूसर सांज काजळीला भिडताना
चंद्रकळेचा पदर भर्जरी, तशी उदासी नसते सुंदर?


आणि ही मूळ रचना

उदासी खूबसूरत...

अम्बुधि लहरों के शोर में
असीम शान्ति की अनुभूति लिए,
अपनी लालिमा के ज़ोर से
अम्बर के साथ – लाल सागर को किए,
विहगों के होड़ को
घर लौट जाने का संदेसा दिए,
दिनभर की भाग दौड़ को
संध्या में थक जाने के लिए
दूर क्षितिज के मोड़ पे
सूरज को डूब जाते देखा!

तब, तट पे बैठे
इस दृश्य को देखते
नम आँखें लिए
बाजुओं को आजानुओं से टेकते
इस व्याकुल मन में
एक विचार आया!
किंतु उस उलझन का,
परामर्श आज भी नही पाया!
की जब विदाई में एक दुल्हन रोती है,
जब बिन बरखा-दिन में धुप खोती है,
जब शाम अंधेरे में सोती है,
तब, क्या उदासी खुबसूरत नही होती है?

- दीपक कुमार




Wednesday, June 1, 2011

आदेश

मजसाठी योजियले जे, ते कार्य पुरे केले मी
आता मज प्रस्थानाचा आदेश मिळावा स्वामी

मंतरलेल्या ऊर्मींचे आभाळ पांघरुन झाले
चौर्‍यांशी लक्षांच्या या चक्रात संचरुन झाले
भोवळ येते प्राणांना, आवेग विरावा स्वामी

का भ्रामक अनुबंधांच्या वचनात व्यर्थ गुंतावे?
जाणीव दुरावत जावी अन् अखेरचे थांबावे!
थकलेल्या आसक्तीचा उद्धार करावा स्वामी

उसळत्या भोग-योगाच्या उत्कटल्या आतुर वेगा
सांभाळावे, अन् घ्यावी झेलून शिरावर गंगा
पाताळ गाठण्याआधी आधार मिळावा स्वामी

स्वामी, या जड देहाला सूक्ष्मात विलीन करावे
भेदून कोश कायेचा प्राणांना मुक्त करावे
आत्म्याचा परमात्म्याशी संयोग घडावा स्वामी