Monday, June 13, 2011

तुला पावसाची आण

तेच थेंब, त्याच सरी, तोच तो खट्याळ वारा
नवानवासा वाटतो, जरी तोच तो इशारा

तेच थेंब, त्याच सरी, तीच पागोळ्यांची गाणी
त्याच मातीच्या गंधाची नवीन अत्तरदाणी

तेच थेंब, त्याच सरी, त्याच कागदाच्या नावा
नव्या उत्साहाने वाट जाते स्वप्नातल्या गावा

तेच थेंब, त्याच सरी, गाभुळलं रानोमाळ
मोर नाचतो धुंदीत, थेंबांचे बांधून चाळ

तेच थेंब, त्याच सरी, तरी नव्हाळी नव्हाळी
गंधगीत गात डोले माझी बकुळडहाळी

तेच थेंब, त्याच सरी, तोच सुरेल मल्हार
आसुसल्या धरणीला नवा हिरवा शृंगार

तेच थेंब, त्याच सरी, नवं सृजनाचं वाण
दे ना मलाही उदारा, तुला पावसाची आण!

3 comments:

  1. सगळच खूप सुंदर आणि वाचनीय आहे !
    छान -छान कविता वाचायला मिळाल्या .

    ReplyDelete
  2. किती सुंदर ?
    कसं कौतुक करू ?
    ... खूप गोड !

    ReplyDelete