Wednesday, June 1, 2011

आदेश

मजसाठी योजियले जे, ते कार्य पुरे केले मी
आता मज प्रस्थानाचा आदेश मिळावा स्वामी

मंतरलेल्या ऊर्मींचे आभाळ पांघरुन झाले
चौर्‍यांशी लक्षांच्या या चक्रात संचरुन झाले
भोवळ येते प्राणांना, आवेग विरावा स्वामी

का भ्रामक अनुबंधांच्या वचनात व्यर्थ गुंतावे?
जाणीव दुरावत जावी अन् अखेरचे थांबावे!
थकलेल्या आसक्तीचा उद्धार करावा स्वामी

उसळत्या भोग-योगाच्या उत्कटल्या आतुर वेगा
सांभाळावे, अन् घ्यावी झेलून शिरावर गंगा
पाताळ गाठण्याआधी आधार मिळावा स्वामी

स्वामी, या जड देहाला सूक्ष्मात विलीन करावे
भेदून कोश कायेचा प्राणांना मुक्त करावे
आत्म्याचा परमात्म्याशी संयोग घडावा स्वामी

2 comments:

  1. तुम्ही ही कविता नेमकी का लिहिली असेल ठाऊक नाही..पण वाचताना गोनीदांच्या 'मोगरा फुलला'ची आठवण झाली.ज्ञानदेवांचा समाधीप्रसंग कवितेतून वाचतेय असं वाटलं.खूप आवडली कविता..

    ReplyDelete
  2. ही प्रार्थना वाचून आदिशंकराचार्यांचा हा श्लोक आठवला -

    संसारसागरविशालकरालकाल -
    नक्रग्रहग्रसितनिग्रहविग्रहस्य ।
    व्यग्रस्य रागनिचयोर्मिनिपीडितस्य -
    लक्ष्मीनृसिंह मम देहि करावलंम्बम् ॥

    ReplyDelete