Saturday, June 11, 2011

घन

घन व्याकुळला तेव्हा मी त्याचीच सावली होते
घन कोसळताना त्याच्या अस्वस्थ चाहुली होते

घन रसरसला, मोहरला, मी नवी पालवी ल्याले
घन फाल्गुनातल्या रानी मी पळसपाकळी होते

घन घुटमळला, विरघळला किरणांच्या धुंद मिठीत,
घन रासरंग गगनात, मी सांज सावळी होते

घन शापित गंधर्वाच्या कंठात मुक्त गंधार,
घुमविता सखा मल्हार मी तान त्यातली होते

घनगर्द घनाची छाया, घननीळ घनाची माया
घनघोर गर्जला तेव्हा मी रात्र वादळी होते

घन मनात, घन देहात झिरपून झरे प्राणांत
घन कणकण भिजवत होता, मीही तहानली होते!


3 comments:

 1. मस्त.....आशय, विषय, मांडणी सगळंच मस्त
  ’घन’ चे अनुप्रास खूप आवडले.

  ReplyDelete
 2. अगदी मस्त...घन घन माला(घनांची मालिका झालेय)!

  ReplyDelete
 3. घनगर्द घनाची छाया, घननीळ घनाची माया
  घनघोर गर्जला तेव्हा मी रात्र वादळी होते

  घन मनात, घन देहात झिरपून झरे प्राणांत
  घन कणकण भिजवत होता, मीही तहानली होते!

  अप्रतिम !

  ReplyDelete