Saturday, September 17, 2011

तुझी भेट व्हावी असे वाटले

तुझी भेट व्हावी असे वाटले अन् तुझ्या आठवांचे थवे हासले
पिसारे किती सप्तरंगी क्षणांचे मनाच्या रित्या अंगणी नाचले

तुझी भेट व्हावी असे वाटले, मी तुझी वाट शोधीत आले खरी,
न वारा तुझा की न चाहूल आली तुझी, फक्त डोळ्यांत आल्या सरी

तुझी भेट व्हावी असे वाटले तोच आला तुझ्या वेणुचा नाद रे,
खरा तो असे की असे भास, काही कळेना मला, घाल तू साद रे

तुझी भेट व्हावी असे वाटले त्या क्षणी भेट झालीच नाही कधी,
किती वाट पाहू इथे एकटी मी? तुझा अंत ना पार लागे कधी!

तुझी भेट व्हावी असे वाटले की मनाच्या तळाशी जरा वाकते,
तुला पाहते, बोलते मी तुझ्याशी, क्षणी चोरकप्पा पुन्हा झाकते!

तुझी भेट व्हावी असे वाटले, एवढी का न आशा जगाया पुरी?
तुला भेटण्याची पदे आळवावी सख्या, जोवरी श्वास आहे उरी!

1 comment:

  1. सुंदर कविता ताई !

    तुझी भेट व्हावी असे वाटले, एवढी का न आशा जगाया पुरी?
    तुला भेटण्याची पदे आळवावी सख्या, जोवरी श्वास आहे उरी
    >>> शेवटच्या ओळीतला आशावाद प्रचंड आवडला

    ReplyDelete