Sunday, September 25, 2011

ध्यासपर्व


उंबरा नाही तुझा आला कधी ओलांडता
काळ आला न्यायला, दारात झाला थांबता
मान झुकवुन जी हुजूरी फक्त केली नेहमी,
हक्क नाही जाणले, नाहीच आले भांडता
विस्कटावे लागले धागे पुरे गोफातले
एकदा सुटल्या, पुन्हा गाठी न आल्या बांधता
धाडसाने घातली मीही उडी, पण शेवटी
कोठडी दैवात आली, सप्तसागर लांघता
हरवली स्वप्ने किती अन् फाटली नाती किती?
विखुरले मी एकटी हे शोधता, ते सांधता
केवढी अनमोल होती तू दिलेली आसवे,
शिंपल्यांनी कैद केली पापणीतुन सांडता
एवढा संदिग्ध नव्हता प्रश्न मी केला तुला,
ध्यासपर्वाची कधी होणार आहे सांगता?

2 comments:

  1. -
    उंबरा नाही तुझा आला कधी ओलांडता
    काळ आला न्यायला, दारात झाला थांबता
    -
    वाह...
    कसला जबरदस्त एफ्फेक्ट आहे क्रांतिताई -
    काळ दारात आला न्यायला तरी त्याची सुद्धा हिम्मत झाली नाही तो उंबरा ओलांडायची इतका तो करकचून आवळलेला न दिसणारा पाश (की फास) होता..
    --
    मान झुकवुन जी हुजूरी फक्त केली नेहमी,
    हक्क नाही जाणले, नाहीच आले भांडता
    --
    कारण... ???
    अबोल, दुस-याच्या अन्यायाला त्यांचा आपल्यासाठीचा नियम असे स्वताला समजावून जगत राहिली...
    असमंजसपणे....? की भारतीय नारी (५० वर्षा पूर्वीची..?) असल्याचा सार्थ(?) अभिमान कायम ठेवून ??
    --
    विस्कटावे लागले धागे पुरे गोफातले
    एकदा सुटल्या, पुन्हा गाठी न आल्या बांधता
    --
    वाह.. काय सही उपमा आहे ही...
    आयुष्याच्या गोफातले सर्व धागे विस्कटावे लागले..
    कारण त्या निर्ढावलेल्या निगरगट्टाप्रमाणे नीरगाठीच इतक्या करकचून बांधलेल्या होत्या की त्या सोडवता सोडवता स्वताचे आयुष्यच पार विस्कटून गेले..
    आणि नाती अस्तव्यस्त झाल्यामुळे कुठले टोक कुठे न्यावे, कुठे जोडावे हेच कळेनासे झाले.
    ---
    धाडसाने घातली मीही उडी, पण शेवटी
    कोठडी दैवात आली, सप्तसागर लांघता
    ---
    ..अन अश्या या स्वताच्या फसलेल्या आयुष्यातून, अस्तव्यस्त झालेल्या विस्कटलेल्या नात्यांच्या भोव-यातून दोनच उपाय दिसतात..
    हनुमान उडी घेउन हा सप्तसागर लांघणे
    किंवा
    सुर्याजीने कापलेल्या दोरखंड-लटकत्या आयुष्याच्या दरीत स्वताला सीतेप्रमाणे सामावून घ्यायची इच्छा करणे..
    .. पण हनुमानाप्रमाणे डोक्यावर आशीर्वादाचा हात इथे नाही त्यामुळे सप्तसागर लांघताना कोठडीच दैवात आली.. हे किती मोट्ठे दुर्दैव..
    ---
    हरवली स्वप्ने किती अन् फाटली नाती किती?
    विखुरले मी एकटी हे शोधता, ते सांधता
    ---
    आयुष्य तर वन-वे असल्या प्रमाणे आहे ...
    जिचा सरळ मार्गच जर इतका खडतर असेल तर त्या कवितेतल्या नायिकेच्या परतीच्या मार्गाची कल्पनाच करवत नाही...
    त्यामुले दुभंगलेल्या, ठिक-या ठिक-या झालेल्या मनाची अवस्था किती भयानक असेल..? आणि तरीसुद्धा तिलाच बिचारी ला एकटीला टाकुन समाज गम्मत बघत बसलाय ..
    स्वप्ने तर सगळीच फाटून तुटून कधीच हरवली.... आणि बेगडी, स्वार्थी फोल नाती सांधता सांधता ती स्वताच बिचारी विखरुन गेली..!
    ---
    केवढी अनमोल होती तू दिलेली आसवे,
    शिंपल्यांनी कैद केली पापणीतुन सांडता
    ---
    - बघा... इतके दुःख सहन करून सुद्धा तिच्या मनातील तरलता आणि हळवेपणा अजिबात कमी होत नाहीये.. उलट त्याला प्रखर धार चढ़त चाललिये..
    सगळ्यां उरफाट्या काळजाचे लोक, उध्वस्त नाती, भग्न स्वप्ने आणि उद्विग्न मन घेउन एकटेपणे लढूनसुद्धा तिच्या मनात एक हळुवार कोपरा आहे त्यात जपून ठेवलेले कधीचे काळवंडलेले अधूरे स्वप्न आहे...
    आणि ते अनमोल स्वप्न पापणीतुन निसटुन कधी हलकेच सांडले....तर लगेच डोळ्यांच्या शिंपल्यांनी स्वताच्याही नकळत पुन्हा कैद केले...
    ---
    एवढा संदिग्ध नव्हता प्रश्न मी केला तुला,
    ध्यासपर्वाची कधी होणार आहे सांगता?
    ---
    - कहर.. कुर्निसात.. काय जबरदस्त आहेत या दोन ओळी..!!!!
    ....सम्पूर्ण कवितेचा 'ताज' आहेत..
    जीवनाचे मर्म, आयुष्याचा आरसा, ती स्वत: लढून लढून अगदी तरबेज झालिये ..
    जशी काही दुःख मागणारी कुंतीच....!!!
    ... म्हणुनच तिने विचारलेल्या प्रश्नात तिला ख़ास असे काहीच वाटत नाहीये..
    परन्तु...
    अनगिनत, अगणित वेळा हा जो जीवनाचा मांडलेला खेळ आहे.. 'ध्यासपर्व' आहे.. तो तर सुरु झालाय... !
    त्याचे उत्तर देण्याची हिम्मत कोणात असेल..?
    शेवटचा केलेला प्रश्न एवढा संदिग्ध नव्हता तर तो काळीज चिरत जाणारा होता.. !
    ५८४ पानी कार्ल मार्क्स फेकून द्यावा अणि तुमची ही कविता एनलार्ज करून लावावी असे वाटते आहे.. !
    कमीतकमी 5 वेळा वाचली आणि प्रत्येक वेळी नविन वाटली तुमची ही गजल ..!!

    :-)
    ________
    जमीर..!
    http://saadhamaanus.blogspot.com/

    ReplyDelete