जशी सायलीची कळी, सोनचाफ्याची पाकळी
तशी नाजूक, देखणी माझी लेक सोनसळी
यावी पुनवेच्या राती जशी शकुनचाहूल,
तसं अंगणात माझ्या तिचं इवलं पाऊल
हसू तिचं जशी बरसावी वळवाची सर,
चांदण्याची गोड खळी गोबऱ्याशा गालांवर
ओठी घेऊन आली ती गोड चैतन्याची गाणी
जसं पहाटेचं स्वप्न, जशी परीची कहाणी
लाडाकोडात वाढली माझी लेक कौतुकाची,
आली जाण छकुलीला मायबापाच्या सुखाची
बरोबरीनं राबते लेक घरादारासाठी
अडचणीला उभी ही, जशी जगदंबा पाठी!
कधी दुखलं काळीज, तिच्या हास्याचा उपाय
लेक होते कधी कधी माय-पित्याचीच माय!
किती गुणाची ही पोर, आहे नक्षत्र की परी?
उद्या उडून जायची कुणा परक्याच्या घरी
जरी घोर आज लागे मायबापाच्या मनाला,
कन्या परक्याचं धन, द्यावं लागे ज्याचं त्याला!
देवा, माझ्या चिमणीला लाभो सुखाचं सासर,
मिळो अतोनात प्रेम, देई एवढाच वर
औक्ष लाभू दे उदंड, व्हावी नभाहून मोठी
जन्मोजन्मी लेक होऊन ती यावी माझ्या पोटी!
वरच्या फोटोइतकी गोड कविता.... आवडली.
ReplyDeleteशेवटच्या कडव्यात देवाजवळ मागितलेलं मागणं तर जबरदस्तच.