Friday, September 16, 2011

दे

दे चंद्र जडवुन गोंदणी अन् चांदण्यांची माळ दे
संध्याछटांनी रंगलेले भर्जरी आभाळ दे

ये एकदा, माझी खुळी आशा मला वेडावते
मनपाखरू माझे तुझ्या वाटेकडे झेपावते
कोमेजल्या, विझल्या दिठीला गर्द हिरवा माळ दे

प्राजक्त माझ्या अंगणी आला तुझ्या बागेतला
माझ्या व्यथेचा हातही त्यानेच हाती घेतला
दे बहर तो फिरुनी मला, तो गंधभरला काळ दे

नाहीस तू जवळी तरी जपले तुझे आभासही
सांभाळली आहे उराशी एक वेडी आसही
आयुष्य देते मी तुला, तू एक संध्याकाळ दे 

2 comments:

  1. आयुष्य देते मी तुला, तू एक संध्याकाळ दे >> सुंदर !!!

    ReplyDelete
  2. खूप छान..
    खूप छान...

    ReplyDelete