समजूत का? कशाला? रुसवा कधी न होता
लटका विरोध माझा कडवा कधी न होता
विनवायची जरी मी, म्हटलेस त्यास आज्ञा,
हलकेच बोल होते, फतवा कधी न होता
झुकण्यात जन्म सारा सरला, मिटून गेला
बुजरा स्वभाव खोटा, फसवा कधी न होता
फुलले न फारशी, ना बहरून धुंद झाले
ऋतु कोणताच माझा नटवा कधी न होता
मनमोकळे कधी ना रडले, न हासले मी
नव्हते कठोर, बाणा हळवा कधी न होता
जळती मशाल किंवा विझली न राख होते,
धुमसायची जराशी, वणवा कधी न होता
इतकेच जाणते की जगणे खरेच होते,
नुसताच भास किंवा चकवा कधी न होता
सुरेख !
ReplyDeleteफुलले न फारशी, ना बहरून धुंद झाले
ऋतु कोणताच माझा नटवा कधी न होता
... छान !
एकदम मस्त गझल.
ReplyDelete"फुलले न फारशी, ना बहरून धुंद झाले
ऋतु कोणताच माझा, नटवा कधी न होता"
हा शेर सर्वात जास्त आवडला
मस्त! मलाही "फुलले न फारशी.." आवडलं.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDeleteलटका विरोध माझा कडवा कधी न होता..