Friday, April 29, 2011

काही गाणी अगदी कायम मनात रुंजी घालत रहातात, ती आपल्याला का आवडतात हे सहजासहजी सांगता येत नाही, पण कधीतरी अचानक काही भाव, काही शब्द मदतीला धावून येतात आणि त्या गाण्याचं आणि आपलं नातं उलगडून देतात. अशा या आगळ्यावेगळ्या कल्पनेला http://www.orkut.co.in/CommTopics?cmm=826350
इथून वेचलं आणि पहिला प्रयत्न केला.




जखमा फुलतील नव्याने,
थरथरेल मन तृणपाते,
भगव्याशा आभाळाचे
क्षितिजाशी धुरकट नाते

त्या कातरवेळी माझ्या
वेदनेस कंठ फुटावा
हुरहुरत्या सांजेला मी
माळून पूरिया द्यावा!

झाडांच्या पार तळाशी
घनदाट स्मृतींचा मेळा
काहूर जागवित याव्या
अन् सांजफुलांच्या वेळा

संध्येची गहिरी दु:खे
गात्रांत भरून उरावी,
मावळताना किरणांना
कविता आतून स्फुरावी

धूसरशा मेघांमधल्या
शिल्पातुन सूर झरावे,
मी ज्योतीसह थरथरता
हे एकच गीत स्मरावे,

"भय इथले संपत नाही,
मज तुझी आठवण येते,
मज तुझी आठवण येते!"


http://www.youtube.com/watch?v=x88r7JI4ljU


No comments:

Post a Comment