Sunday, July 1, 2012

खुळा पाऊस

जाणून धरेचा ध्यास 
खुले आकाश 
अचानक भरले 
घन गर्द दाटता
गात्र गात्र मोहरले 

चाहूल सख्याची घेत 
हळूच कवेत 
लाजली धरती 
घन निळे-जांभळे 
झरले वृक्षांवरती 

पाण्यात पाहती बिंब 
सुखाने चिंब 
तरूंवर वेली
सत्यात उतरली 
स्वप्ने रंगवलेली 

दरवळे हवासा गंध 
कराया धुंद 
बरसले पाणी 
सुचवून फुलांना 
थेंबनाचरी गाणी 

ओढाळ मनाची आस 
तुझे आभास 
घनागत झरले 
मन दाटुन येता 
व्याकुळ डोळे भरले 

घनरिते पापणीबंध 
अनावर गंध 
तरळला भवती 
फिरफिरुन स्मृतींची
तृणपाती लवलवती 

हा असा खुळा पाऊस 
नको देऊस 
पिसाट मनाला 
बरसेल घनातुन 
जाळिल आत जिवाला 


1 comment:

  1. थेंबनाचरी गाणी ..

    वेगळ्या आकृतीबंधातली कविता खूप आवडली

    ReplyDelete