Sunday, March 17, 2013

कदाचित

माझ्या मुठीत काही होते कमी कदाचित
लाचार होत गेले म्हणुनीच मी कदाचित 

त्याने रुसून जावे, मी आर्त आळवावे 
रंगेल नाट्य आता हे नेहमी कदाचित 

माझ्यावरील मिथ्या आरोप सिद्ध झाले 
चालेल फक्त आता 'त्या'ची हमी कदाचित 

तादात्म्य साधण्याची संधी निघून गेली 
तो काल दूर होता अन् आज मी, कदाचित 

काही अगम्य ओळी, अस्वस्थ शब्द थोडे 
मागे उरेल माझी ही बेगमी कदाचित 

No comments:

Post a Comment