Sunday, March 31, 2013

अळीमिळी गुपचिळी

नाच बाई नाच घुमा 
लागेना का ठेच ग 
घाव आप भरेल, तू 
काटेकुटे वेच ग 

नाच बाई नाच घुमा 
सांडू दे ना रक्त ग 
डोळा भरो, घाव झरो 
हास सये फक्त ग

नाच बाई नाच घुमा
तुझ्यासाठी तूच ग
स्वार्थासाठी जग देतं
सुखाची लालूच ग

नाच बाई नाच घुमा
झाला जरी ताप ग
तुझं बेगडी कौतुक
जन्मजात शाप ग

नाच बाई नाच घुमा
भरे जरी हीव ग
सरू आला श्वास तरी
गुंतलेला जीव ग

नाच बाई नाच घुमा
गेला जरी प्राण ग
अळीमिळी गुपचिळी
तुला तुझी आण ग 

No comments:

Post a Comment