Monday, April 4, 2011

तुझा सहवास


तुझ्या नजरेने गात्रांवर गोंदलेली धुंदी
श्वास श्वासांत माळून गेले बकुळ सुगंधी
तुझ्या बोलण्याने छेडलेली मंद नंदधून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

तुझ्या प्राजक्ताचा गंध माझे फुलवी अंगण
तुझ्या भासाचे-ध्यासाचे माझ्याभोवती रिंगण
धुंद होते, मिरवते तुझ्या चाहुली लेऊन
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

वीज लहरे देहात अशी तुझी नेत्रबोली
तिच्या वर्षावात चिंब होते लाजून अबोली
मला लपवू पहाते, डोळे माझेच झाकून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!


तुझी हिरव्या चाफ्याची प्रीत भिनते अंगात
जागेपणी रंगते मी तुझ्या स्वप्नांच्या रंगात
जग विसरते, जाते देहभान हरपून
तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!


3 comments:

 1. .......छान
  "मला लपवू पहाते डोळे माझेच झाकून"
  ही ओळ जास्त आवडली.

  ReplyDelete
 2. अतिशय सुंदर ! खूप खूप आवडली...

  मला लपवू पहाते, डोळे माझेच झाकून -- खूपच सुंदर !

  ReplyDelete
 3. अतिशय सुंदर कविता ...प्रेमात आकांत बुडलेली तरुणीला अगदी समोर उभी केली ...

  जग विसरते, जाते देहभान हरपून
  तुझा सहवास उसळतो रोमरोमातून!

  ReplyDelete