Wednesday, August 28, 2013

मायबापा

विकल, विवश चित्ती वासनांचा विखार 
जनन-मरण यांचा व्यर्थ हा येरझार 
विफलपण हरोनी शांतवी अंतरंगा 
अगणित करुणेच्या सागरा पांडुरंगा

सगुणपण तुझे मी नित्य नेत्री भरावे 
अनवरत हृदी या निर्गुणाला स्मरावे 
समचरण पुजावे टेकुनी नम्र माथा 
विनित पतित भक्ता उद्धरी विश्वनाथा 

जड तनु वितळावी आणि मी मुक्त व्हावे 
चरणरजरुपाने पायरीशी रमावे 
भ्रमित जगत मिथ्या भौतिकाचा पसारा 
शरण तुज अरूपा, तूच अंती निवारा 

पसरुन विरलेली फाटकी जन्मझोळी 
विनवित विठुराया भाबडी, दीन, भोळी 
हरण करुनि न्यावे भोग, संताप, व्यापा 
चल-अचल जगाच्या एकल्या मायबापा

वृत्त - मालिनी 

No comments:

Post a Comment