Monday, August 12, 2013

सांजऋचा

तुरळक मेघ निळ्या फलकावर फुंकर मारुन पांगवले 
अलगद रंगछटा बदलून भुरे-पिवळे-भगवे-ढवळे
उधळुन लाल गुलाल तशातच स्वर्णिम-केशर वर्ख दिला 
पसरून किंचित श्यामल रेशिम सुंदरसा पट रंगविला 

अतिरस त्यागुन तांबुस मोहक भास्कर-रूप प्रसन्न दिसे 
दिनभर तापुन जीवन व्यापुन स्वत्व समर्पुन तृप्त असे 
परतुन जात असे तरिही अनुपम्य प्रभा रमणीय किती 
अधिकच सात्विक आणि अलौकिक तेजशिखा किरणे दिसती

किलबिल चंचल वाढतसे, घरट्यात पुन्हा फुलणार सुखे
भरवुन घास पिलांस, निरागस स्नेह मिळून प्रसन्न मुखे
परत घरी निघतात गुरे गिरवीत धुळीतुन पायखुणा
अगणित भावुकशा कविता, हळवी कवने सुचतात कुणा

प्रतिपल एक नवीनच दृश्य प्रशांत क्षितीजतळी दिसते
नवल किती, मन कुंठित बालक होउन त्यात रमे नुसते
बहुविध अद्भुत सांजऋचा घनगंभिरशा श्रवणी घुमती
सहज नितांत सुरेख चितारुन चित्र प्रभू करि गुंग मती


[वृत्त - श्रवणाभरण]

1 comment:

  1. सॉलिड … अफाट … साष्टांग नमस्कार

    ReplyDelete