Wednesday, August 28, 2013

ठिगळ

कधी उकलते, कधी न कळते मनाची कथा
निवांत असता कशी उमळते पुराणी व्यथा?
नको असुनही गळ्यात पडते अभागी जिणे
कुठे परवडे अशा अडनिड्यासवे चालणे?

मना, उमलत्या कळ्या नकळता सुकाव्या जशा
तुला सतत का उदास प्रतिमा स्मराव्या अशा?
क्षणात हसणे, क्षणात रुसणे, क्षणी तापणे
तुलाच जमते हवा बदलते तसे वागणे

जरा निवळता उदासपण का ऋतू पालटे?
छळे कलह आतला फिरुन पाहुनी एकटे
दुकान सजते जुने नवनव्या विकारांसवे
शिळेच दुखणे नव्या चटकदार स्वादांसवे

उणे-अधिक बोलणे विसरुनी पुढे जायचे
असे ठरविले तरी समर संगती यायचे
मनास म्हणते पुरी करुन येथली संगरे
निघून दुसऱ्या दिशेस वळवायचे मोहरे

जुनी जखम जागते, विव्हळते तशी वेदना
अखंड झिजण्यामधून कुठली नवी प्रेरणा?
अनादि जगणे, अनंत मरणे कुणा भावते?
तरी ठिगळ पैठणीस मखमालिच्या लावते !

वृत्त - पृथ्वी 

No comments:

Post a Comment