Saturday, October 27, 2012

आसवांनी घात केला

वाटले होते छळावे आज माझ्या वेदनेला 
आसवांनी घात केला 

बांधले संधान होते वेदनेने प्राक्तनाशी 
आणि माझ्या स्पंदनांशी 
वाहिली रक्तातुनी ती, पेलताना जन्म गेला 
आसवांनी घात केला 

सोसवेना, साहवेना, भार आता वाहवेना
की मुक्याने राहवेना 
एकला आधार शब्दांचा तिने उध्वस्त केला 
आसवांनी घात केला 

ती तशी माझीच होती, का मला झाली नकोशी?
का सुटायाची असोशी?
'घे तुला सर्वस्व माझे' शब्द मी होता दिलेला 
आसवांनी घात केला 

मी तिला आंजारले-गोंजारले, केली विनंती 
आणि ती गेलीच अंती 
काळजाचा सुन्न ठोकाही तिच्यामागून गेला 
आसवांनी घात केला 

1 comment:

  1. छान !

    अवांतर : ’ आसवांनी घात केला ’... ही अशीच का वागतात कोण जाणे... :(

    ReplyDelete